पणजी : भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, कार्यकर्त्यांकडे चर्चा केल्यानंतर मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच पुढे जायचा निर्णय घेतला आहे. एका पक्षाचा शेला उतरवून ठेवल्यानंतर अन्य पक्षांनी माझ्याशी संपर्क केला; परंतु मला अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरायचे आहे. माझ्या मागे जनमत आहे की नाही किंवा मी किती पाण्यात आहे, हे मलाही पाहायचे आहे. कारण २०१७ मध्ये माझा पराभव झाला, तेव्हा काही स्वकीय माझे जनमत गेले असे म्हणू लागले, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.
मांद्रे मतदारसंघात ३३५ मतांपासून मी पक्ष मोठा गेला, परंतु गेल्या पाच वर्षांत जे काही मी पाहिले ते अनपेक्षित होते. मंडल, बूथ समित्यांवर जुन्या, तसेच मूळ कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. काल मी पक्ष सोडल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापले राजीनामे अध्यक्षांकडे पाठवून दिले. मला पक्षाने गृहीत धरले. तिकीट नाही दिले तरी मी कुठेही जाणार नाही, असे पक्ष नेत्यांना वाटले होते. परंतु, त्यांचा अंदाज चुकला, असे पार्सेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेली ३० वर्षे हा पक्ष मी वाढविला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मला पक्ष सोडावा लागला. पक्षाच्या भरवंशावर राहिलो. मला तिकीट मिळेल याची खात्री होती. परंतु, मला डावलण्यात आले आणि जे बेभरवंशाचे होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने नाराज झालेल्या दिलीप परुळेकर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे साळगावचे उमेदवार जयेश साळगावकर यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत परुळेकर यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.
तानावडे म्हणाले की, नाराज झाल्यानंतर परुळेकर यांनी भाजप सोडला नाही. पक्षासोबतच ते राहिले. निवडणुकीत तिकीट मिळणेच सर्व काही नाही. ते अनेक वर्षे पक्षासोबत होते व त्यांनी पक्षाचे काम केले. प्रामाणिकपणे जो पक्षाचे काम करतो त्याचा पक्ष नेहमीच सन्मान करतो. पक्षासाठी ते नेहमीच काम करीत राहतील. निवडणुकीत मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परुळेकर म्हणाले की, भाजप पक्षाने आपल्याला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, यासाठी त्यांचे आभार. पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली ती निश्चितच आपण प्रामाणिकपणे पार पाडू. मध्यंतरी आपण नाराज झालो असलो तरी अन्य पक्षांत जाण्याचा विचार आपण कधीही मनात आणला नाही. निवडणुकीत भाजपसाठी साळगाव मतदारसंघात काम करू. कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्के वाढ !
वीज मंत्री नीलेश काब्राल यांच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ झाल्याने गोव्याला मोफत वीज का मिळत नाही हे स्पष्ट होते, असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले.
पालेकर यांनी नमूद केले की काब्रालच्या २०१५-२०१६ च्या संपत्ती एकूण उत्पन्न रु. ९,५०,४७४ , तर त्याच्या २०१९-२०२० मध्ये त्याचे एकूण उत्पन्न रु. ३,१९,७२,६३२ आहे. हे ३००० टक्के वाढ दर्शवते. पालेकर म्हणाले की, काब्राल यांना ‘२५ दिन में पैसा डबल योजना’ माहीत आहे असा टोमणा त्यांनी मारला.
पालेकर म्हणाले की, बहुतेकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोफत वीज देण्याच्या आश्वासनावर टीका केली. मात्र, भ्रष्टाचार संपवला तर गोव्याला मोफत वीज देणे शक्य आहे, असे ‘आप’कडून वारंवार सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा राजकारण्यांच्या खिशात जात आहे. पाच वर्षांत काब्रालचे उत्पन्न तिपटीने वाढले यावरून भाजपचे मंत्री भ्रष्टाचारात किती गुंतले आहेत हे दिसून येते.
पालेकर यांनी गोवेकरांना काब्राल यांच्यापर्यंत पैसे घेऊन जाण्याचे आवाहन केले. काब्रालला ‘२५ दिन में पैसा डबल योजना’ माहीत असल्याने ते पैसे दुप्पट करतील. गोव्याचे बजेट २१,०५६.३५ कोटी रुपये आहे आणि प्रत्येक गोमंतकीवर १,४०.००० रुपये खर्च करण्यात येते. काब्रालच्या संपत्तीत झालेली वाढ पाहिल्यानंतर तो पैसा कुठे गेला हे लक्षात येईल. अशा गब्बरांना बाहेर काढण्याची गरज आहे. काब्राल हेराफेरी भाग ३ साठी तयारी करत आहेत. आता कुडचडेच्या लोकांनी मतदारसंघाच्या भल्यासाठी ‘आप’ला मत देण्याची ही संधी घेणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.
आप कुडचडेचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस म्हणाले की, काब्राल यांनी २०१२ मध्ये खाण बायपासचे आश्वासन दिले होते, परंतु प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. बसस्थानक प्रकल्प, क्रीडा संकुल किंवा रवींद्र भवन अद्याप पूर्ण केलेले नाही.