Top Newsराजकारण

मनसे – राष्ट्रवादीतील संघर्ष पेटला; आरोप-प्रत्यारोपांना जोर

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, हे प्रत्युत्तर मनसेच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिलीय. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय.

जगदीश खांडेकर म्हणाले, महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं. एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचं काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झालाय का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही.

मिटकरी यांना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटर बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू. तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करुन जातात, आता जास्त काळ्या काचा करुन जा. नाहीतर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाहीतर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी खांडेकर यांनी दिली.

मिटकरींनी केलीली टीका मनसेला चांगलीच झोंबली आहे. मिटकरींच्या टिकेला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनीही टोला लगावला आहे.

रोहित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं विश्लेषणही रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी दोन ट्विट करून राज यांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button