राजकारण

संजीव भट्ट यांच्या आरोपानंतर गुजरातमध्ये राजीनामे घेतले का? : संजय राऊत

परमबीर सिंगांचा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: परमबीर सिंग हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर महाराष्ट्र सरकाराने विचार करायला हवा, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, दबाव आणला जातो, असे त्यांनी म्हटले होते. मग परमबीर सिंग हेदेखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर असाच दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. दरम्यान, मात्र, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांचीही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा मुद्दा भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी थयथयाट केला.

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट आणि शर्मा यांनी तत्कालीन गुजरात सरकारवर असेच लेटरबॉम्ब टाकले होते. यानंतर संजीव भट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. आम्ही ही पत्र समोर आणली तर कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे नेते त्यावर कारवाईची मागणी करतील का? भाजप महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय, का लावत आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारीला नागपुरात होते की मुंबईत असा सवाल विचारल्यानंतर संजय राऊत चांगलेच वैतागले. राज्य सरकारने तारखांची माहिती द्यायला वेगळा विभाग सुरु केलाय का? शरद पवार जे बोलले ते पूर्ण अभ्यास करुनच बोलले. ते लॉजिकल आहे. 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख सक्रिय नव्हते. त्यामुळे या सगळ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपचे नेते गुजरातमध्ये एक न्याय लावतात तर इतर ठिकाणी वेगळा न्याय लावतात. अधिकाऱ्याने लिहलेले पत्र म्हणजे पुरावा नाही. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, भाजप सोयीचे राजकारण करु पाहत आहे. आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button