परमबीर सिंग निलंबनाच्या कारवाईला कोर्टात आव्हान देणार
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खंडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. त्यावरून सुरूवातीला त्यांचं निलंबनही करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नंतर स्वत: अडचणीत सापडले. परमबीर सिंग यांच्यावरही नंतर अनेक गंभीर आरोप झाले, त्यानंतर परबीर सिंग काही काळ फरार झाल्याचं दिसून आलं. मात्र सुप्रीम कोर्टानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंग पुन्हा मुंबईत आले.
सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या.आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंग यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंग कोर्टातही जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत परमबीर सिंग विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची तात्काळ बदली करत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांनी वाझेला खंडणीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाचा रस्ता दाखवला. मुंबई हायकोर्टात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर परमबीर सिंग यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि परमबीर सिंग यांचं निलंबन करण्यात आलं. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात धाव घेतल्यावर परमबीर सिंग यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.