राजकारण

पंढरपूर पोटनिवडणूक : शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे निलंबित

सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी सातत्याने वाढत चालली असून बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शैला गोडसे या गेल्या विधानसभेच्या वेळी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र पक्षाने युतीमध्ये उमेदवारी डावलल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी सुरुवातीपासून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे उमेदवारी मागितली होती. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने त्यांनी शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांचीही भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी भालके यांच्या कुटुंबातच देण्यात येणार असल्याचे समजताच त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात केली.

शैला गोडसे यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारी असल्याने शिवसेनेतून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याने शैला गोडसे यांचेवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज सामना या मुखपत्रातून शैला गोडसे यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button