
अबुधाबी : पाकिस्तान संघाची गाडी सुसाट वेगानं पळतेय. भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आज पाकिस्तानचे फलंदाज नामिबियाची धुळधाण उडवली. कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही जोडी तर भलत्याच फॉर्मात आहे आणि त्यांनी आज नामिबियाविरुद्ध अनेक विक्रम केले. पाकिस्तानच्या मोठ्या आव्हानासमोर नामिबियाचा संघ दडपणात खेळेल असा अंदाज होता. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर १२ मध्ये प्रथमच खेळणाऱ्या नामिबियानं चांगला खेळ करताना चाहत्यांची मनं जिंकली. पाकिस्ताननं विजयाचा चौकार मारून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली. पाकिस्तानने नामिबियाचा ४५ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक स्पर्धेत ग्रुप-२ मधून उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १८९ धावा केल्यानंतर पाकिस्तानने नामिबियाला २० षटकांत ५ बाद १४४ धावांत रोखले.
बाबरनं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. यूएईत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाल्याचे प्रमाण फार कमी आहे. तरीही उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी बाबरनं हा निर्णय घेऊन संघाला त्यासाठीही तयार राहण्यास सांगितले. सुरुवातीला संयमी खेळ केल्यानंतर बाबर-रिझवान जोडी सुसाट सुटली. बाबर व रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांची भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली. जगातील कोणत्याच जोडीला हा विश्वविक्रम करता आलेला नाही.
बाबरनं ४९ चेंडूंत ७ चौकारांसह ७० धावा केल्या. रिझवानही कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ९०० धावा करणारा जगातला पहिला फलंदाज ठरला. बाबर माघारी परतल्यानंतर रिझवाननं फटकेबाजी केली आणि त्याला मोहम्मद हाफिजची साथ मिळाली. पाकिस्ताननं पहिल्या १० षटकांत बिनबाद ५९ धावा केल्या होत्या आणि अखेरच्या ६० चेंडूंत त्यांनी १३० धावा चोपल्या. रिझवाननं ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७९ धावा केल्या. हाफिजनं १६ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या. पाकिस्ताननं २ बाद १८९ धावा केल्या.
पाकिस्ताननं एवढ्या धावा केल्यानंतर नामिबियाचा संघ शरणागती पत्करेल असे वाटले होते. पण, त्यांच्या फलंदाजांनी कमाल केली. मिचेल व्हॅन लिंगेन (४) दुसऱ्याच षटकात माघारी जाऊनही नामिबियाचे खेळाडू खचले नाही. स्टीफन बार्ड व क्रेग विलियम्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. दोघांनी संयमी खेळ केला, परंतु बार्ड २९ धावांवर माघारी परतला. विलियम्सला गेरहार्ड इरास्मसची साथ मिळाली, परंतु त्यांनाही मोठी भागीदारी करता आली नाही. त्यांनी फार फटकेबाजी केली अशीही नाही, परंतु त्यांचा धैर्यानं सामना केला. डेव्हिड विसे (३० चेंडूंत नाबाद ४३) व क्रेग विलियम्सन (३७ चेंडूंत ४०) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. हसन अली, इमाद वसिम, हॅरिस रौफ आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नामिबियानं ५ बाद १४४ धावा केल्या. पाकिस्ताननं ४५ धावांनी हा सामना जिंकला.