आरोग्य

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल २२ जणांचा मृत्यू

नाशिक : एकीकडे ऑक्सिजन बेड अभावी कोरोना रुग्णांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या टाकीला बुधवारी दुपारी गळती लागली. गळतीमुळे अचानकपणे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने तब्बल २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. पाऊण तासात गळती रोखण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले. दरम्यान, अचानक आलेल्या या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये एकच हाहाकार उडाला. रुग्णांचे नातेवाईक हंबरडा फोडून रडत असल्याचे अतिशय विदारक चित्र हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाले.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२.३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते, तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल असेही राजेश टोपे यांनी जाहीर केले. दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गळती कशी लागली?

टाकीत दुपारी १२ च्या सुमारास ऑक्सिजन भरला जात होता. त्याचवेळी टाकीला जोडलेल्या पाईपलाईमध्ये दाब वाढला. परिणामी पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. फुटलेल्या भागातून ऑक्सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्सिजनचे पांढरे लोट हॉस्पिटलबाहेर दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे पाऊण तासात गळती थांबवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पाऊण तासानंतर गळती लागलेल्या नोझलची वेल्डिंग करण्यात आली.

ऑक्सिजनचा तुटवडा

गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर हा अक्सिजन अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा अक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने घबराट पसरली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करणार: राजेश टोपे

नाशिकच्या दुर्घटनेत ११ महिला आणि ११ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे. स्थानिक आयुक्त यांच्याशी बोललो आहे. घटनास्थळी भेट देण्यासाठी जात आहे. ते कोविड सेंटर होते. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल,अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

३० ते ३५ जण दगावल्याचा सुधाकर बडगुजर यांचा दावा

मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात ६१ रुग्ण हे गंभीर आहेत. तर ३० ते ३५ जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. ज्या एजन्सी ऑक्सिजन प्लांट बसवला असेल, त्यांनी या ठिकाणी टेक्निकल टीम ठेवणं गरजेचे होतं. ऑक्जिन प्लांट हे डॉक्टर बघत नाहीत. ते टेक्निकल काम असतं. मात्र त्यांनी टेक्निकल टीम या ठिकाणी का ठेवली नाही? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. रुग्णालयात टेक्निकल टीम ठेवली असती तर दुर्घटना झाली नसती. त्यामुळे हलगर्जीपणा करण्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सुधाकर बडगुजर यांनी केली.

दोषींवर कायदेशीर कारवाई

या दुर्घटनेत दहा ते अकरा जण दगावल्याची माहिती मिळत आहेत. एकूण ३०० जण ऑक्सिजनवर होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. सध्या तरी हलवले जाणार नाही, रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला आहे, अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

अमित शाह यांच्याकडून संवेदना

नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यानं झालेल्या दुर्घटनेची बातमी ऐकून व्यथित झालो. या घटनेत ज्यांनी नातेवाईक गमावले आहेत ही त्यांच्यासाठी कधीच न भरुन येणारी आहे. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. इतर रुग्ण बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button