मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं उद्घाटन झालं. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे, असा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यांनी याबाबत ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.
आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.#BDDChawl #Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2021
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. वर्ष १९२० ते १९२४ या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉईड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडींची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.
वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका (निवासी ९३९४ + अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झालेय. प्रत्येक सदनिकांमध्ये ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.
पुनर्वसनातून ५०० चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार
शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटांच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० चौरस फुटांची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.