Top Newsराजकारण

राज्यपालांचा शिवसेनेला मोठा झटका; मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठीची आश्रय योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही योजना आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने शिवसेनेला चांगलाच झटका बसला आहे. या योजनेत शिवसेनेने घोटाळा केल्याचे भाजपने आरोप केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. यानिमित्ताने शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष आणखी वाढत जाणार असल्याचे दिसून येते.

भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आश्रय योजनेबाबत लेखी तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता राज्यपालांनी या योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपाल कोश्यारींनी लोकायुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीच्या सूचना केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्यपाल कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. या पत्रासंदर्भात भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी माहिती दिली आहे. दरम्यान विनोद मिश्रा आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने १७ डिसेंबरला राज्यपालांची भेट घेत याबाबतची तक्रार दिली आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे.

आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी १ हजार ८४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या मंजूरीस भाजपाने विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही हा प्रस्ताव मंजूर झाल्याने विनोद मिश्रा यांनी योजनेत घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यपालांना लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना योजनेची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

विनोद मिश्रा यांनी योजनेत घोटाळा झाल्याचे आरोप करत राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी ३९ वसाहतींचा पुनर्विकासाठी ३३ लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा आराखडा होता. पण कंत्राटदारांच्या इच्छेनुसार पालिकेने ७९ लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खर्चात अनेक पटीने वाढ झाली. त्यामुळे बांधकामाच्या निविदा या ठराविक कंत्राटदारांना काम मिळाव्या अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या. मात्र सफाई कामगारांना चांगली घरे मिळायला हवीत. पण सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे जो भष्ट्राचार सुरु आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button