
कोलंबो : पृथ्वी शॉ आणि इशान किशन या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुय्यम म्हणून संबोधणाऱ्या माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाची या निकालानंतर बोबडी वळली. रणतुंगाच्या म्हणण्यानुसार ‘टीम इंडियाच्या बी संघानं’ श्रीलंकेचे २६३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन यानंही संयमानं खेळ करताना अर्धशतकासह अनेक विक्रमांचीही नोंद केली.
श्रीलंकेच्या चमिका करुणारत्ने व दुश्मंथा चमिरा यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपून काढताना टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करण्यात यश मिळवला. त्यांनी ९ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. चरिथा असालंका ( ३८), कर्णधार दानूश शनाका ( ३९) यांनी समाधानकारक खेळ केला. चहलनं १० षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यानं १० षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपल्या. दीपक चहरनं ३७ धावांत २ बळी टिपले. कुलदीपनेही ४८ धावांत २ विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. त्यानं पहिल्या विकेटसाठी शिखर धवन ५८ धावांची भागीदारी केली. यात पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या २० चेंडूंत पृथ्वीनं ३९ धावा चोपल्या. २००८मध्ये वीरूनं हाँगकाँगविरुद्ध ४१ धावा कुटल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय सलामीवीरानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पृथ्वी माघारी परतल्यानं आलेल्या पदार्पणवीर इशान किशननं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. इशान किशनने वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्यानं ३३ चेंडूंत ५२ धावा केल्या. कर्णधार शिखर धवन नॉन स्ट्रायकर एंडवरून इशानची आतषबाजी पाहत होता. इशाननं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या.
शिखर धवननं ९५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव २० चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ३६.४ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पार केले. टीम इंडियानं ७ विकेट्स व ८० चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.




