
ठाणे : राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यावर चिखलफेक करतात म्हणून आगामी पालिका निवडणुकीत त्यांच्याशी आघाडी करू नये अशी भूमिका शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. परंतु, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक एकतर्फी नाही. शिवसेनेचे पदाधिकारीही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे महाआघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. शिवसेनेला आघाडी करण्यात स्वारस्य नसेल तर आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत. हिंमत असेल तर शिवसेनेने येत्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी घेतली आहे.
खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी कुणी पाठपुरावा केला आणि त्याचे श्रेय कुणाला या मुद्यावरून गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध पेटलेले आहे. लोकार्पणाचा सोहळा संपल्यानंतर या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका प्रसिद्धी माध्यमांकडे मांडली. मात्र, त्यानंतर लगेचच शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आनंद परांजपे यांनी भूमिका मांडली. त्यानंतर महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन टीका टिपण्णी केली. शिवसेनेला आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छा नसून आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करून अशी भूमिकाही महापौर नरेश म्हस्के आणि राम रेपाळे आदींनी मांडली आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या १२ वर्षांत जितेंद्र आव्हाड यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कळवा मुंब्र्यात विकासाची गंगा अवतरली आहे. वर्षानुवर्षे रखडलेली असंख्य विकासकामे आव्हाड यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळेच या मतदार संघात ते विक्रमी मताधिक्क्याने निवडून येतात. त्यांना कोणत्याही कामांचे श्रेय लाटण्याची गरज नाही. ये पब्लिक है सब जानती है, असे सांगत नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्या कार्यबाहुल्याचे कौतुक केले आहे.
राष्ट्रवादी आमच्यावर चिखलफेक करत असल्याने त्यांच्याशी आघाडी नको असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, आम्ही टीका केली तर ती चिखलफेक असेल तर त्यांची टीका स्तुस्तीसुमने ठरत नाहीत. शिवसेनेही आमच्या नेत्यांवर आरोप करून बदनामी करत आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाच दुटप्पी आहे. आघाडी धर्माचे पालन हे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे. त्यांना आगामी निवडणूकीत आघाडी करण्याची इच्छा नसेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. शिवसेनेच्या मागे आमचा पक्ष फरफटत जाणार नाही हे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्यनात ठेवावे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार सतत वाढत आहे. त्यामुळे पुन्हा आपलीच सत्ता येईल या भ्रमात कुणी राहू नये असा इशाराही मुल्ला यांनी दिली आहे.
भाजप आमदाराने घेतली महापौरांची भेट
एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत असतांना चर्चेत नसलेल्या भाजप आता चर्चेत आला आहे. सोमवारी महापौर नरेश म्हस्के आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यात महापौर दालनात भेट झाली आणि आता वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. या भेटीमागचे कारण काय, कोणते नवे राजकारण शिजत आहे, अशी चर्चा आता पालिका वुर्तळात सुरु झाली आहे.
वाद निर्माण करुन चर्चेत राहण्याचा या दोन्ही पक्षांचा हेतू असतांना मागील काही दिवसापासून चर्चेपासून दूर असलेली भाजप मात्र अचानक चर्चेत आली आहे. सोमवारी महापौर दालनात नरेश म्हस्के आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यात भेट झाली. यावेळी म्हस्के यांनी केळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संदीप लेले, मिलिंद पाटणकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे महासभा असेल किंवा इतर पातळ्यांवर शिवसेना विरुध्द भाजप असा लढा मागील कित्येक दिवस ठाणेकर पाहत आहेत. प्रत्येक महासभेत भाजप विरोधी भूमिकेत दिसून आला आहे. भाजप विरुध्द महापौर असा सामना देखील याच ठाणोकरांनी पाहिला आहे. असे असतांना अचानक या भेटीमागचे कारण काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. चाय पे चर्चा म्हणत यावेळी आणखी काही वेगळ्या चर्चा तर झाल्या नाहीत, ना?, अशी धाकधुक आता राष्ट्रवादीत सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन
विविध प्रकल्पांमध्ये बाधीत झालेल्या नागरिकांना घरे देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून भ्रष्ट अधिकार्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी या घोटाळ्यामध्ये स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांचाच सहभाग असल्याने त्यांना निलंबित करुन कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आनंद परांजपे यांनी केली. तर, शानू पठाण यांनी, धनदांडग्यांकडून पैसे घेऊन गोरगरीबांची घरे लाटण्यात आलेली आहेत. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बाधितांचे पुनर्वसन करताना घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीएने ठामपाकडे घरे वर्ग केली आहेत. त्यानुसार ठामपाने यादी तयार करून घरांचे वाटप करण्यात आले. सन ०१६ मधील रस्ता रूंदीकरणातील बाधितांना घरे दिली. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणार्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस बायोमेट्रिक सर्वे, संगणकीय चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. पालिका अधिकार्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी, ‘गांधी लढे थे गोरोसे; हम लडेंगे चोरोंसे, चोर है चोर है, ठामपा अधिकारी चोरे है; पालिका आयुक्त होश मे आवो’; अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये घोटाळा झालेला आहे. रस्ता रुंदीकरण, विविध विकास प्रकल्प यामध्ये गोरगरीबांची घरे बाधीत झालेली आहेत. त्या गोरगरीबांना न्याय हक्काने घरे मिळाली पाहिजेत. मात्र, या घरांमध्येच ठामपाच्या अधिकार्यांनी मोठा घोटाळा केला. या अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्व घोटाळ्याच्या मागे महेश आहेर हेच कारणीभुत आहेत. ते अकरावी नापास आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी मी पत्र दिले; पुरावेही दिले होते. मात्र, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी थातूरमातूर जबाब घेऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. गोरगरीबांना घरे देण्याऐवजी धनदांडग्यांसाठी खोटे कागदपत्र आणि शिक्के बनवून ज्यांनी हे कृत्य केले आहे त्याचे मुख्य सूत्रधार महेश आहेर हेच आहेत. त्यांच्यावर कारवाई करायला पालिकेचे आयुक्त डॉ. शर्मा हे तयार नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
जर खर्या अर्थाने निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर आहेर यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. जोपर्यंत त्यांना पदावरुन हटवित नाहीत. तो पर्यंत ह्या घोटाळ्याचा तपास योग्यरितीने होणार नाही. आपण ठाणे पोलिसांनाही विनंती करीत आहोत की, त्यांनीही दबावाला बळी न पडता या मास्टरमाईंडवर कारवाई केलीच पाहिजे. जर पोलिसांनी दबावाला बळी पडून कारवाई केली नाही तर आपण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहोत;आयुक्तांना आपण या निमित्ताने जाहीर आवाहन करीत आहोत की त्यांनीही महेश आहेर यांना निलंबित करावे अन्यथा आम्ही असे समजू की आयुक्तांचे भ्रष्ट अधिकार्यांना पाठबळ आहे. दरम्यान, शानू पठाण यांनी, ठामपामध्ये वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे भ्रष्टाचार अधिकार्यांच्या संगनमताशिवाय होत नाहीत. एकीकडे गोरगरीब बाधीतांना घरे दिली जात नाहीत; तर दुसरीकडे धनदांडग्यांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रे आणि चाव्या बनविण्यात आलेल्या आहेत. याचा मास्टरमाईंड जो आहे; त्या अधिकार्यावर कारवाई करावी. आयुक्तांनी आपली जबाबदारी ओळखून संबधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करुन चौकशी समिती जाहीर केली नाही तर आपण कोविडचे नियम पाळत ठामपा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा दिला.




