राजकारण

आधी शेतकऱ्यांना मदत करा; फडणवीस उद्यापासून ३ दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही टीका करतील

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षव नाना पटोले यांच्या एका टीकेवर प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. नाना पटोले हे काहीही बोलत असतात. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते अमेरिकेच्या अध्यक्षांवरही टीका करतील. त्यामुळे त्यावर बोललचं पाहिजे का?, असा सवालही त्यांनी केला.

कोकणात अजूनही मदत नाही

दरम्यान, फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button