
नवी दिल्ली : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा भार आला आहे. काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. मुंबई, दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. वाढत्या इंधन दरावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारमध्ये फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तसेच गडकरींमध्ये हिंमत आहे. यामुळे त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद करायला हवा असं देखील म्हटलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं गडकरींनी एका जाहीर कार्यक्रमात स्वीकार केलं होतं. त्यावर चिदंबरम यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारमधील सर्व निर्णय हे पंतप्रधान मोदी घेतात हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. यामुळे कोण अर्थमंत्री आहे आणि कोण नाही, याला काही अर्थ उरत नाही. पंतप्रधान स्वतः अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि क्रीडामंत्री आहेत. तेच सर्वेसर्वा आहेत. पण केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्येच हिंमत आहे. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. पण सध्या तेही गप्प आहेत. त्यांनी आपला आवज उठवला पाहिजे. त्यांनी कॅबिनेटमध्ये आपला आवाज बुलंद केला पाहिजे, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये देशातील पहिल्या एलएनजी पंपाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पर्यायी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाल्याचे गडकरींनी सांगितले. एलएनजीमध्ये ट्रक, बस कन्ह्वर्ट करण्यासाठी १० लाखांचा खर्च आहे. सरासरी या वाहनांचे वर्षाचे रनिंग हे ९८ हजार किमी आहे. यामुळे एलएनजी कन्व्हर्ट केलेले असल्यास वर्षाला तुमचे ११ लाख रुपये वाचणार आहेत. डिझेलमुळे तुमचा खर्च जास्त होत आहे. हा खर्च ३५ टक्क्यांवर येणार असून ६५ टक्के फायदा राहणार आहे. एलएनजीमध्ये केलेली गुंतवणूक ही २९५ दिवसांतच भरून निघणार आहे. पुढे फायदाच फायदा असेल असे गडकरी म्हणाले.
नागपूरमध्ये एलएनजी भरला की ते वाहन ८०० किमी चालणार आहे. यामुळे मुंबई, हैदराबाद सारख्या शहरांना जाताना येताना एलएनजी पंप उभारावे लागणार आहेत. असे केल्यास वाहतूकीचा खर्च कमी होणार असून डिझेलवरील सरकारचे तसेत वाहन मालकाचे पैसे वाचणार आहेत, असे गडकरी म्हणाले. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंजिनचा पर्याय ठेवला आहे. वाहन निर्माता कंपन्या ज्या भारतात वाहने विकतात त्यांच्या फ्लेक्स इंजिन असेलेल्या गाड्या कॅनडासारख्या देशांमध्ये आहेत. त्या कंपन्यांना भारतातही य़ापुढे फ्लेक्स इंजिनचा पर्याय देण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय येत्या तीन महिन्यांत घेण्यात येईल, असे ते म्हणाले. यात मोठे काही नाही, एक छोटा पार्ट बदलायचा आहे, आणि इंजिनमध्ये थोडे बदल करायचे आहेत. मग हे इंजिन इथेनॉलवर देखील चालणार आहे. या वाहनांच्या किंमती आणि पेट्रोल वाहनांच्या किंमतीत मोठा फरक नाहीय, असेही गडकरी म्हणाले.