Top Newsराजकारण

गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाच उपचाराची गरज : पटोले

मुंबई – आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाही, तर एका गावगुंडाबद्दल बोललो होतो हे आधीच स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून त्यांची बदनामी करत आहेत. राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात पटोले म्हणाले की, मी एका गावगुंडाबद्दल बोललो होतो, त्या गावगुंडाने प्रसार माध्यमासमोर येऊन सर्व सांगितले आहे तसेच तो गावगुंड जे बोलला ते मी माध्यमांना सांगितले. मी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कोणताही अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे हे थांबवा असे मी म्हणालो, तरीही भाजप नेते माझ्याविरोधात आंदोलन करुन पुतळे जाळत आहे. भाजप त्या गावगुंडाचे समर्थन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्याचा संबंध जोडून त्यांना बदनाम करण्याची मोहीम चालवत आहे.

भाजपला माझे पुतळे जाळायचे असतील तर त्यांनी खुशाल जाळावेत, पण भारत माता की जय म्हणून जे लोक देश विकत आहेत त्यांचे पुतळे जाळा, बेटी बचाव, बेटी पटाव, म्हणणाऱ्यांचे पुतळे जाळा, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्यांचे पुतळे जाळा. देशात आज अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्यांबरोबर बेरोजगारांच्या आत्महत्याही वाढत आहेत. ज्यांच्यामुळे देशाची अधोगती सुरु आहे त्यांचे पुतळे त्यांनी जाळावेत.

पंतप्रधानपदाचा मान, सन्मान, प्रतिष्ठा याची काँग्रेसला जाणीव आहे, त्या पदाचा अवमान करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही. परंतु भाजपचे नेतेच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर असताना कोणत्या भाषेत बोलत होते ते सर्वांना माहित आहे. स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणणाऱ्या भाजपचा सुसंस्कृतपणा त्यावेळी कुठे गेला होता. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य आणि माझे वक्तव्य हे दोन्ही विषय वेगळे आहेत. त्याची तुलना भाजपने करु नये, असेही पटोले म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, माझे मानसिक संतुल बिघडले आहे असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेच खरेतर मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. भाजपचा आम्ही पराभव केला आहे, त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे, या धक्क्यातून ते सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक कळत नाही त्यांना उपचाराची जास्त गरज आहे असा टोला पटोलेंनी लगावला.

केंद्रातील भाजप सरकारकडून गांधी विचार संपवण्याचा डाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या विचाराने हा देश मार्गक्रण करत असून गांधी विचार जगाने स्विकारलेला आहे. गांधींची अहिंसेची शिकवण हीच देशाला तारणारी आहे. मात्र मागील ७ वर्षापासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून गांधी विचार पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यभर एक संदेश जावा यासाठी एक कार्यक्रम ३० जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर गांधीचे विचार, अहिंसेची शिकवण, राष्ट्रीय एकात्मतेची आठवण व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन गांधींचे स्मरण करावे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यासमोर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पटोले यांनी केले आहे. ३० जानेवारी हा अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. गांधी विचार ही काळाची गरज आहे. हा विचारच देशाला तारणारा आहे परंतु तो विचारच संपवण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळ्यात वाजवली जाणारी ‘अबाइड विद मी’ ही महात्मा गांधी यांची आवडती धूनही आता बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच ‘मोनिका माय डार्लिंग’ या फिल्मीगाण्यावर सैन्यदलाचे जवान डान्स करतील असा व्हिडीओ केंद्र सरकारने ट्वीट केला आहे. ही सैनिकांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. हे थांबवून ‘अबाइड विद मी’ हीच धून वाजवली जावी अशी काँग्रेसची मागणी आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारा चित्रपट ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ प्रदर्शित होत आहे. गोडसेला हिरो करण्याचे काम केले जात आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडेही पत्रादावारे मागणी करण्यात आली आहे. असे पटोले यांनी सांगितले.

केंद्र सरकारने परवाच दिल्लीतील ‘अमर जवान ज्योत’ विझवून जवानांच्या शौर्य, त्याग व बलिदानाचा अपमान केला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली १९७१ साली पाकिस्तानला धडा शिकवून बांग्लादेशाची निर्मिती करण्याचा इतिहास घडवला. त्याची साक्ष देणारी अमर जवान ज्योत विझवली. इंदिरा गांधी यांच्यासारखे कर्तृत्व नाही म्हणून त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत उत्सव देशभर साजरा केला जात असताना ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरू यांचा साधा उल्लेखही भाजपा सरकारने केला नाही. नेहरुंचे योगदान नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ नेहरू-गांधी यांच्या द्वेषातून त्यांना विरोध करायचा म्हणून हा ऐतिहासिक वारसा पुसला जात आहे, असेही पटोले म्हणाले.

महात्मा गांधी यांचा वारसा, स्वातंत्र्याचा इतिहास हे सगळे खोडून काढण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button