
नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर महिनाभरासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव हेही सहभागी आहेत. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता.
पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर योगेंद्र यादव यांच्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला. निलंबनाच्या कालावधीत योगेंद्र यादव शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबत यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.
भारतीय किसान युनियन दोआबाचे अध्यक्ष मंजित सिंग राय यांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.
हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर पाच दिवसांनी आशिष मिश्रा याला अटक झाली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये दिसलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमित जयस्वाल याचाही समावेश आहे. तो व्हायरल व्हिडीओमध्ये पळून जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले, अशा प्रकारची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ड्रायव्हर, मित्र आणि भाजपचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.