शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील : कलराज मिश्र

जयपूर: आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतान, भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे म्हटले आहे.
वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात केली. नवे कृषी कायदे का केले, याबाबतचे सत्य शेतकरी बांधवांना समजावून सांगण्यात आमचे प्रयत्न, तपश्चर्या कमी पडली. त्यामुळे देशाची मनापासून माफी मागतो, असे म्हणत, आगामी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असे त्यांनी जाहीर केले. यानंतर देशभरातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. यातच राजस्थानचे राज्यपाल असलेल्या कलराज मिश्र यांनी भदोई येथे पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. केंद्रीय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. मात्र, शेतकऱ्यांना समजवण्यास किंवा ते पटवून देण्याचा सरकारने सातत्याने प्रयत्न केला. तरीही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आणि कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम होते. अखेर कृषी कायदे रद्द केले पाहिजे, असे सरकारला वाटले.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या केलेली घोषणा म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. पंतप्रधान मोदींचा हा निर्णय साहस आणि धाडस दर्शवतो. मात्र, भविष्यात गरज भासल्यास पुन्हा एकदा कृषी कायदे करण्यात येतील, असे मिश्र यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली असली, तरी शेतकरी नेते आणि आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले असले, तरी संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घेतली आहे.