दिलीप वळसे-पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
हसन मुश्रीफ यांच्याकडे कामगार विभागाचा, तर अजित पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असं म्हटलं आहे. तसंच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात म्हटलं आहे.
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवल्यानंतर सध्या त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावा, अशी पत्रात विनंती करण्यात आली आहे.
दिलीप वळसे-पाटलांचा राजकीय आलेख
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर जाणार याबाबत तर्कवितर्क सुरु होते. त्यानंतर चर्चेत सर्वात आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे-पाटील यांचं नाव होतं. दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्यात. हेच वळसे पाटील आता राज्याचे गृहमंत्री असणार आहेत. गृहविभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
दिलीप वळसे-पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या विधीमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्रियांच्या खडानखडा माहितीमुळे आघाडी सरकारला चांगलंच बळ मिळालं होतं.
मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्त्वाचे कार्य होऊ शकले विद्युत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, 6000 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; 2009-2014 अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .
2012-13 मध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.