Top Newsराजकारण

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खा. संभाजीराजे संतप्त; २५ ऑक्टोबरपासून पुन्हा दौरा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच येत्या २५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगितलं.

खा. संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. येत्या २५ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

मराठा तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांच्या उभारणीची समाजाची मागणी आहे. त्याबाबत ३६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये सरकार वसतीगृह उभरणार आहे. सरकारची इमारत असलेल्या जिल्ह्यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जबाबदारी सरकार घेणार आहे, अशी ग्वाही सरकारनं दिल्याचंही ते म्हणाले होते.

कर्जाची मर्यादा १० लाखावरून २५ लाखापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यालाही सरकारनं मान्यता दिलीय. त्याचबरोबर मराठा समाजातील मुलांचे शिक्षण, शिक्षणासाठी परदेशात जाण्याबाबतही या महामंडळामार्फत मदतीचा पर्याय आहे.

एमपीएससीच्या नियुक्तांबाबत विशेष बाब म्हणून मुलांना नियुक्त्या द्या अशी मागणी आम्ही केलीय. सुपर न्युमररी अर्थात अधिसंख्येची जागा देण्याबाबतचा पर्यायही सरकारला सुचवला आहे. त्यावर सरकारने अटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांना सांगितलं आहे. कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या जागांमुळे सरकारवर आर्थिक भार वाढणार आहे. तो भार सोसू असा शब्द सरकारनं दिल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं होतं.

मराठा आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने आश्वासन दिलंय. १४९ पैकी एकच गुन्हा मागे घेता येणार नाही. बाकी गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टात अपील करणार अशल्याचं सरकारनं सांगितलं. त्याचबरोबर एक समिती स्ठापन केली जाणार आहे. ही समिती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांसोबत दैनंदिन बैठक होणार. त्या बैठकीत या सर्व गोष्टी युद्धपातळीवर कशा मार्गी लावल्या जातील त्याबाबत दैनंदिन चर्चा होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button