राजकारण

मुंबईतील खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवून शिवसेनेला डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यारुन भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजपने नागरिकांना खड्ड्यांचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी पाठवलेल्या फोटोंचे महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच प्रदर्शन भरवले जाणार आहे. या अनोख्या आंदोलनाद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपचे दक्षिण मध्यचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांच्या संकल्पनेतून हे खड्ड्यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

मुंबई, पाऊस आणि खड्डे हे समिकरण नेहमीच पाहायला मिळतं. मागील काही दिवसांपासून मुंबईत चांगलाच पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मुंबबईतील खड्ड्यांची समस्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. याच कारणामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांना काल चांगलंच खडसावलं. महापौर यांनी अधिकाऱ्यांची घेतलेली शाळा मुंबईत चर्चेचा विषय ठरली. मात्र, आता याच मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच या फोटोंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. भाजप नेते राजेश शिरवाडकर यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन केले जात आहे. यावेळी भाजपने नागरिकांना फोटो काढून पाठवण्याचे आवहान जरी केले असले तरी यामागे शिवसेनेला लक्ष करण्याचा मुख्य हेतू आहे.

रस्त्यांवरील खड्यांचे प्रदर्शन भरवून भाजपतर्फे ही अनोखी गांधीगिरी दाखवली जाणार आहे. तसेच खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेना तसेच मुंबई महापालिका यांच्यावर गंभीर टीका केली आहे. महापौर यांनी नौटंकी बंद करावी. त्याऐवजी त्यांनी रस्त्यांकडे लक्ष द्यावे. सध्या खड्ड्यांमुळ मुंबईकरांना जो त्रास होत आहे, त्याला पालिका जबाबदार आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button