राजकारण

इंजेक्शन चोर भाजप नेते, ब्रुक फार्मा कंपनीवर तत्काळ खटला दाखल करा : सचिन सावंत

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाद आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपचे नंदुरबारचे नेते शिरीष चौधरी यांच्या हॉटेलमध्ये रेमडेसिवीरचा साठा करण्यात आल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेते आणि ब्रुक फार्मा कंपनीवर तत्काळ खटला दाखल करा, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शिरीष चौधरी यांनी अमळनेर आणि नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले होते.

सचिन सावंत यांनी शिरीष चौधरी यांचा इंजेक्शन वाटतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तत्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिलला भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगी रित्या कशी वाटली? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तिला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही, मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी हे दरेकर व लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे, असं सचिन सावंत म्हणाले. तसेच डीसीपी मंजूनाथ सिंग यांनी योग्य कारवाई केली होती. भाजप नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button