
चंदिगड : पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. उलट दिवसागणिक दोन्ही गटांमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना एक खरमरीत पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पंजाबच्या राजकारणात तुम्ही पडू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील या अर्थाची चिठ्ठी काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी थेट सोनिया गांधी यांना लिहिल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींनी आता उघड स्वरूप धारण केलं आहे. काँग्रेसने नवी जबाबदारी दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या काम करण्याची पद्धत सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना रुचणारी नाही. त्यातूनच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्ट शब्दांत पत्र लिहिल्याचं समजतं. काँग्रेसच्या हायकमांडला त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी असे खरमरीत पत्र लिहून इशारा देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असावा. त्यामुळे हायकमांडची पकड ढिली झाली की काय अशी चर्चा राजधानीत सुरू आहे.
काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते हरीश रावल आजच शनिवारी चंदिगडला रवाना होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या वतीने ते त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील, अशी शक्यता आहे. सिद्धू यांचं वर्चस्व कायम राहिलं तर पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडेल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बजावलं आहे. दुसरीकडे कॅप्टनविरोधी गटातले काही मंत्री सिद्धू यांच्या गोटात सामील होत बैठका घेत आहेत. सिद्धू यांच्या गोटात ५ मंत्री आणि १० आमदार असल्याचं समजतं. सिद्धू यांच्या समर्थकांची बैठक सुरू होताच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीदेखील मोहालीतील फार्म हाउसमध्ये आपल्या समर्थकांची बैठक घेतली. आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने हा वाद एवढ्या लवकर संपणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत.




