Top Newsराजकारण

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत ‘वर्षा’वर अर्धा तास चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा केली. महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडी बघता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. ठाकरे आणि पवार यांच्याच जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे ते पुढचा आठवडाभर दिल्लीतच राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. या बैठकीत संसदेचं अधिवेशन, कृषी कायदे आणि नव्या सहकार कायद्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

येत्या १९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची काय भूमिका आणि मुद्दे असावेत यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर कृषीविषयक प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर संसदेत काय भूमिका मांडावी, या विषयावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक विषय चर्चेसाठी आहेत. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचं नवं खातं निर्माण केलं आहे. या खात्याची सर्व सूत्रे अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे. सहकार क्षेत्राशी अनेक मुद्दे संबंधित आहेत. पुढच्या काळात केंद्र सरकारचा राज्यांच्या सहकार क्षेत्रावर हस्तक्षेर होऊ शकतो, अशी धास्ती आहे. त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button