साहेब म्हणजे राजकरणातील म्हटलं तर ‘बाप माणूस’, म्हटलं तर ‘ काका माणूस’ ! म्हणजे नाही शत्रू पक्षांसाठी पण मित्र पक्षांसाठी तर नक्कीच ‘बाप माणूस’; आणि कोणत्याही पक्षातल्या वाट चुकलेल्यांसाठी ‘काका माणूस’! आता बाप म्हटला की , तो कधीतरी ‘बुड्ढा’ होणारच . मुलं थोडी मोठी झाली की शेजारच्या बापांशी आपल्या बापाची तुलना करणारच. मग लहानपणी ‘पापा दि ग्रेट’ वाटणारा आपला बाप आपण समजत होतो तितका काही ग्रेट नाही आणि आता तो ‘बुड्ढा’ झाला आहे याची जाणीव त्यांना होणारच. मग आपोआपच बापाची किंमत कमी होणारच. आता आपल्याबाबतीतही हे सर्व होतांना पाहून साहेब अस्वस्थ झालेत. अशा अस्वस्थ, बेचैन अवस्थेत त्यांना आपलं बालपण आठवलं आणि त्यांना एकदम हायसं वाटलं. शाळेतल्या परीक्षेत नाही का आपण कधीच पाहिले येऊ शकलो नाही, नेहमीच 50 – 55 मार्क्स मिळवत राहिलो ; पण एका परीक्षेतआपल्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेल्या मित्रावर , तो बऱ्याचदा वर्गात पहिला आला आहे हे विसरून , त्याच्यावर फिदीफिदी हसून, त्याची टिंगलटवाळी करत आपण आपले कमी मार्क्स लपवलेच की नाही , या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. आताही तेच करायला हवं या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य अधिकच रुंद झालं. आता त्यांना आपल्या मित्र पक्षाची टिंगलटवाळी करायला नवीनच मुद्दा मिळाला होता.
त्या भारावलेल्या अवस्थेतच साहेबांनी कपाटातून आपल्या आवडत्या चित्रपटाची सी.डी. काढली आणि ते आपला आवडता चित्रपट पाहू लागले.जेव्हा केव्हा साहेबांना राजकारणातले डावपेच खेळण्याचे प्रसंग येत असत किंवा दोन राजकीय मित्रांमध्ये फूट पाडून दोघांचेही बारा वाजवायचे असत तेव्हा तेव्हा साहेब घरात बसून हाच चित्रपट पाहत असत. त्यातूनच त्यांना दिशा आणि यशही मिळत असे. चित्रपट पाहतांना क्षणोक्षणी साहेबांच्या अंगात रक्त सळसळत असे , उत्साह संचारत असे. अजूनही आपण तरुण आहोत , अजूनही आपण बरंच काही करू शकतो, अजूनही आपण एकटेच शत्रूची दिशाभूल करून, मित्र म्हणून त्याच्या गोटात शिरून त्याचा नायनाट करू शकतो, हे त्यांना चित्रपट पाहताना क्षणोक्षणी जाणवत असे. आपण भलेच आयुष्यात ‘ अँग्री यंग मॅन’ कधी नसू , पण समोरच्या पडद्यावर दिसणारा ‘ अँग्री ओल्ड मॅन’ म्हणजे आपणच , फरक काय तो फक्त पार्श्वभूमीचा, त्याची पार्श्वभूमी गुंडगिरीची तर आपली राजकारणाची ! ‘ असा विचार हा चित्रपट पाहताना दरवेळी साहेबांच्या मनात डोकावत असे आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावत असे.
आजही चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू झाला आणि साहेब सोफ्यावर थोडे जास्तच सावरून बसले. संपूर्ण चित्रपटातला हा त्यांचा सर्वात जास्त आवडता भाग. त्यांना प्रेरणा देणारा हाच तो भाग. सी.डी. फॉरवर्ड रिवाइंड करून अक्षरशः शेकडो वेळा पाहिलेला. जणू काही चित्रपटाचे लेखक, निर्देशक पुरी जगन्नाथ यांनी तो साहेबांकडूनच लिहून घेतला असावा. साहेब एकाग्रतेने पाहू लागले. त्यांना चित्रपटाच्या नायकाच्या, विजूच्या (अभिताभ बच्चन) जागी ते स्वतः आणि समोरच्या गँगच्या जागी आपले मित्र पक्ष दिसू लागले. चित्रपटाचा नायक विजू मित्र बनून गँगमध्ये घुसतो. आपले कर्तृत्व दाखवून त्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर आणि विश्वास निर्माण करतो. अशी परिस्थिती निर्माण करतो की गँगचे सदस्य एकमेकांपेक्षाही विजूवर जास्त विश्वास ठेवायला लागतात. मग त्यांची दिशाभूल करून, त्यांच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण करून त्यांच्यात फूट पाडतो आणि बघता बघता संपूर्ण गँगचा सफाया करतो. त्यातून शेवटी वाचलेल्या एकमेव अशा मकरंद देशपांडेला बॉसच्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो, ‘ अब बैठ इसपर और राज कर.’ भांबावलेला मकरंद देशपांडे त्या खुर्चीवर बसतो. आजूबाजूला मरून पडलेल्या आपल्या साथीदारांवर आणि उध्वस्त झालेल्या अड्ड्यावर एक नजर टाकतो आणि दोन्ही हातांनी आपलं डोकं गच्च धरून समोर उभ्या असलेल्या विजूला केविलवाण्या आवाजात विचारतो , ‘ अरे, किसपर राज करू ? किसपर राज करू मैं ?’ साहेब मनापासून हसले. त्यांनी ‘ बुड्ढा ..होगा तेरा बाप’ची सी.डी. परत जागेवर ठेवली आणि एका यु ट्यूब चॅनेलला मुलाखत देण्यासाठी ते बाहेर पडले.
महाराष्ट्रापुरतं अस्तित्व असलेल्या आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले साहेब एका यु ट्यूब चॅनलला मुलाखत देत आहेत, जी सतरा दर्शक लाईव्ह पाहत आहेत. मुलाखत सुरू होताच साहेबांच्या डोळ्यांपुढे कालच्या ‘ बुड्ढा …होगा तेरा बाप’चा क्लायमॅक्स तरळून जातो. मनातल्यामनात संदर्भ जुळवून ते मुलाखतकर्त्याला सांगतात, ‘ आमचा मित्र पक्ष म्हणजे जमीनदारी बुडालेला, पडक्या वाडयात राहणारा जमीनदार . रोज सकाळी आपल्या पडक्या वाड्याबाहेर उभा राहून, आपली गेलेली जमीन पाहत बसतो. आता त्याच्याकडे वाडा दुरुस्तीलाही पैसे नाहीत. ओसाड गावची पाटीलकी मिळाली आहे त्याला.’ असं बोलतांनाच त्यांच्या लक्षात येतंं की, अरे त्याच्याकडे तरी कधीतरी जमीनदारी होती, आपण तर कायम दुसऱ्याच्याच शेतात राबलो आणि त्यांचा चेहरा उतरतो. ते ताबडतोब चेहऱ्यावर मास्क चढवतात.