ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकेत काम केलं आहे.
नवी मुंबई इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. या आंदोलनातही मयुरेश कोटकर यांचा समावेश होता. परंतु या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यात येईल. दुसऱ्या मोठ्या प्रकल्पला दि बा पाटील यांचं नाव दिलं जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. नामकरणाच्या या प्रकरणावरुन मयुरेश कोटकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मागील आठवड्यात शुक्रवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.
यासंदर्भात शिवसेनेकडून श्रीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मयुरेश कोटकर यांच्याविरोधात मानहानी, प्रक्षोभक भाषा आणि दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणं याबाबत आयपीसीच्या विविध कलमांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला. यावर कारवाई करत पोलिसांनी मयुरेश कोटकर यांना अटक केली. तसंच त्यांना संबंधित पोस्ट डिलीट करायला लावली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.