आरोग्य

आता आरटी-पीसीआर चाचणी आणखी स्वस्त

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना आता पुन्हा एकदा व्यवहार हळूहळू रुळावर येत आहेत. सध्या कामकाजाच्या ठिकाणी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यातच फ्रान्सच्या ‘पाथ स्टोअर’ या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही कंपनी संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. सध्या गुरूग्राम येथे कंपनीनं आरटीपीसीआर आणि जैव सुरक्षा स्तराची चाचणी करणारी लॅब उभारली आहे. यात एका दिवसात १ लाख नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता आहे. स्वस्तात आरटीपीसीआर चाचणी होणार असल्यानं याचा पर्यटन, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रात खूप मोठी मदत मिळणार आहे.

समाजातील आर्थिकरित्या कमकुवत गटाला कोरोना चाचणी स्वस्तात उपलब्ध झाल्यानं मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात देशातील सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये विविध ठिकाणी कंपनीकडून स्वस्तात आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. यात कंपनीकडून आरटीपीसीआर चाचणीसाठीचे नमुने जमा करण्यासाठी २ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती पाथस्टोअर कंपनीची मूळ कंपनी असणाऱ्या जेनेस्टोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुभव अनुषा यांनी दिली.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी सध्या दोन चाचण्यांचा पर्याय उपलब्ध आहे. यात आरटीपीसीआर आणि दुसरा पर्याय रॅपिड अँटिजन टेस्ट उपलब्ध आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या रुग्णांला कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित करण्यात येतं. पण रॅपिड अँटिजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणी अधिक अचूक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीला सर्वाधिक महत्व आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button