विरारमध्ये कोविड रुग्णालयात भीषण आग; १३ जणांचा होरपळून मृत्यू

विरार : नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना तसेच मुंबईतील भांडूप, नागपूर आणि भंडारा येथील कोविड रुग्णालयांमधील आगीच्या घटना ताज्या असताना मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या विरारमधून आगीची भयंकर घटना समोर आली आहे. या आगीमध्ये १३ रुग्णांनी प्राण गमावले आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घटना घडली आहे.
विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयूमधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये ही आग लागली. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. अग्निशामक दलाने तत्काळ हालचाली करून चार रुग्णांना वाचवले. मात्र, इतर १३ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाचा अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे. पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आले.

या दुर्घटनेमध्ये संपूर्ण आयसीयू बेचिराख झालं आहे. याठिकाणी आयसीयूमध्ये डॉक्टरच नव्हते असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी याठिकाणी केली जात आहे.

वसईतील कोविड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.




