मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो या वादग्रस्त वक्तव्यावरुन भापज नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक भाजप नेत्यांनी नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे नाना पटोलेंविरोधात नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यातच आता या वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंचा समाचार घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेल्या कामाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
अमृता फडणवीसांनी हिंदीत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलेय, ‘सूरज को डूबाने का इरादा रखते है कुध नन्हे पटोले! पर इल्म नही है उन्हें के इस प्रगती की रोशनी को बुझाने की होड मे, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले’.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !
पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! #ModiHaiToMumkinHai #modiJiJiyoHazaroSaal @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/y4JLNyrmho— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 18, 2022
या पोस्टमधून अमृता फडणवीसांनी मोदींना सूर्याची उपमा दिली आहे. ‘काही लहान पटोले सूर्याला बुडवण्याचा बेत आखत आहेत. परंतु त्यांना माहिती नाहीये, या प्रगतीच्या तेजाला विझवण्याच्या नादात ते स्वत:लाच जाळून टाकतील’, असा हल्लाबोल अमृता फडणवीसांनी नाना पटोलेंवर केला आहे.
नाना पटोले रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी भंडारा येथे गेले होते. त्यादिवशी त्यांच्या निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी विविध सभा घेतल्या. याच वेळी मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी ट्विट करत , ‘माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल केला जात असून मी हे वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत’, असल्याचे स्पष्ट केले होते.