आता राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग; आठ आमदारांनी घेतली सचिन पायलट यांची भेट
जयपूर : उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांना पक्षात प्रवेश देऊन काल भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. दरम्यान, जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर आता राजस्थानमधील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पक्षात दीर्घकाळापासून नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या गोटात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे. पायलट यांच्या गटातील आठ आमदारांनी पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. या आमदारांमध्ये सचिन पायलट यांचे निकटवर्तीय रामनिवास गावडिया यांच्यासोबत विश्ववेंद्र सिंह, पी.आर. मीणा, मुकेश कुमार या नेत्यांच्या समावेश आहे. दरम्यान, या बैठकीमुळे सचिन पायलट हे भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.
ही बैठक का बोलावण्यात आली याबाबत सध्यातरी काही स्पष्ट झालेले नाही. मात्र यात काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा नक्कीच झाली असावी, अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सचिन पायलट यांनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर वाटाघाडी समितीकडून दहा महिन्यांनंतरही काही निर्णय न झाल्याने पायलट यांनी राजारी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. सोबतच पक्षाच्या नेतृत्वाबाबतही ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेश पायलट यांची पुण्यतिथी ११ जून रोजी आहे. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करत आहेत. त्यामाध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आपल्या नाराजीचे संकेत देण्याचा त्यांचा प्रयत्न आहेत.
दरम्यान, सचिन पायलट यांच्या गटात हालचालींना वेग आल्याने आता गहलोत गटसुद्धा अलर्टवर आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धर्मेंद्र राठोड यांनी हल्लीच पायलट समर्थक विश्वेंद्र सिंह आणि पी.आर.मीणा यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गहलोत सरकारमध्ये पायलट गटामधील आमदारांचा समावेश करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.