पदवी परीक्षांसाठी ‘सीईटी’ नाही, १२ वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश : उदय सामंत
मुंबई : पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेश प्रक्रिया होणार असून उद्यापासून पदवी परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत बारावीच्या निकालावरच पुढील पदवी परीक्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून पदवी परीक्षांचे प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागाचे पारंपारिक पद्धतीने अभ्यासक्रम सुरू होतील. आवश्यकतेनुसार, तुकड्यांची वाढ किंवा विद्यार्थी संख्येत वाढ हवी असल्यास ३१ ऑगस्टच्या आधी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी विद्यापिठाने घ्यावी अशा स्पष्ट सूचना माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.