राजकारण

गायब केलेला डीव्हीआर, सीपीयू मिठी नदीत सापडला

सचिन वाझेंच्या समोर एनआयएचा तपास

मुंबई : मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि मनुसख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत असून रोज नवनवे खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणांशी निगडीत असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही या तपासात समोर आले. हेच पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात आता एनआयएच्या हाती काही ठोस गोष्टी लागल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारे डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू आणि इतर काही गोष्टी एनआयएला सापडल्या आहेत. मिठी नदीत ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांसोबत सचिन वाझे हेसुद्धा उपस्थित होते. हा मोठा ऐवज हाती लागल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा उलगडा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या दोन्ही प्रकाराशी निगडीत असलेले अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तसेच या प्रकरणांच्या तपासासाठी मदत होणारे सीसीटीव्ही फुटेज साठवलेला डिव्हीआर, तसेच संगणकाचा सीपीयू नष्ट नदीत फेकण्यात आला होता. सचिन वाझे यांचे घर असलेल्या साकेत काँम्प्लेक्स या सोसायटीतील डीव्हीआरसुद्धा गायब होता. त्यानंतर एनआयएने तपास मोहीम राबवत गायब असलेले डीव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिठी नदीत एनआयएला डिव्हीआर आणि इतर सामान सापडले आहे. सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन डिव्हीआर शोधण्यात आला. दरम्यान, डीव्हीआर आणि सीपीयून सापडल्यामुळे एनआयएचे हे मोठे यश असून या दोन्ही प्रकरणांची लवकर उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button