राणे कुटुंबाचा पिंडच विकृतीचा; विनायक राऊतांकडून जहरी टीकास्त्र
मुंबईः नारायण राणेच्या कुटुंबाचा पिंड विकृतीचा आहे. ही विकृती गाडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या जनतेनं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आमचीही चमकदार कामगिरी झाली. यापूर्वी आमच्याही एवढ्या सीटस् नव्हत्या, अशा शब्दात शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी टीकास्त्र डांगले आहे.
मराठवाड्यात महाविकास आघाडीचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळल्याने नवीच राजकीय चर्चा सुरू झालीय. त्यांचाही राऊतांनी समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांनी एक जानेवारी रोजी औरंगाबादमध्य बोलताना अक्षरशः फटाक्यांची माळ फोडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळ आजारातून बरे झाले नाहीत, तर एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. शिवाय मी शिवसेनेत आग लावण्याचे काम करत नसून, उद्धव यांच्यानंतर शिवसेनेमध्ये तेच नेते सक्षम नेतृत्व करू शकतात, असा दावा केला होता. उद्धव आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विनाप्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा सवालही त्यांनी केला होता. शिवाय महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तारांनी शिवसेना आणि भाजप युतीचा पूल नितीन गडकरीच बांधू शकतील, असे विधान केले होते. त्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेचं विधान गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. त्यांना विनोदाने बोलण्याची सवय आहे. भाजपचे विचार त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केले. राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा कारभार चांगला चालवत आहेत, याचा उल्लेखही त्यांनी केला.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबीय आणि नितीन गडकरी यांचं नात चांगलं आहे. महाविकास आघाडी कोणीही भंग करू शकणार नाही. सत्यपाल मलिकांच्या वक्तव्यांनी एकाधिकारशाहीला छेद दिला आहे. देशात एकाधिकारशाही सुरू आहे. नरेद्र मोदींविषयी अनेक भाजपच्या खासदारांचं तेच मत आहे. आता लाव्हा उसळत आहे. त्याचा कधीतरी भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.