
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितला. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आता पुन्हा देशमुखांना समन्स पाठवले आहे. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज बोलावले होते. मात्र, वैद्यकीय कारण देत आज अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावे असे समन्समध्ये सांगण्यात आले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडीच्या चौकशीसंदर्भात देशमुख यांचे वकील जयवंत पाटील म्हणाले की, आम्ही ईडीला अर्ज करून चौकशीची अंमलबजावणी कोणत्या आधारे केली जात आहे, याची कागदपत्रे मागितली आहेत.’ आमच्याकडे तपासणीच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. म्हणून आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीला यावर निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना समन्स बजावून शनिवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्याला बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) समन्स बजावण्यात आले होते आणि देशमुख यांना हजर होण्यास सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुसरी वेळ मागितल्यानुसार ईडीने पुन्हा समन्स बजावून मंगळवारी चौकशीला बोलाविले आहे.
सीबीआयच्या रडारवर आता देशमुखांची दोन्ही मुलं?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.
सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी गुंतवणूक केलेल्या एका कंपनीच नाव समोर आलं आहे. या कंपनीचं नाव झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. दोघं भावंडांनी मार्च २०१९ मध्ये झोडियाक डेलकॉम ही कंपनी आणि तिच्या उपकंपन्या विकत घेतल्या. यामध्ये जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, काँक्रीट रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिसा प्रायव्हेट लिमिटेड आणि काँक्रीट इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चारही उपकंपन्या अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या नावावर आहेत. या झोडियाक कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय सीबीआयला आहे.
पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी
ईडीने अटकेत असलेले संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा रिमांड मिळावा यासाठी त्यांना कोर्टात हजर केलं. मुंबई सेशन कोर्टातील न्यायमूर्ती डॉ यु. एल. मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपी संजीव पालांडे यांची बाजू वकील शेखर जगताप तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर यांनी मांडली. तर ईडीच्यावतीने सुनील गोंसावलीस यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने दोघांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी दिली.




