आरोग्य

विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीचे विलगीकरण

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीमध्ये (SOP) सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारित कार्यपद्धती तत्काळ लागू करण्यात आली असून त्याचे कटाक्षाने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

मुंबई विमानतळावर विदेशातून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक 21 डिसेंबर 2020 आणि दिनांक 27 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार सुनिश्चित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. मुंबई महानगरात निश्चित केलेल्या हॉटेल्समध्ये या प्रवाशांना विलगीकरणात रहावे लागते. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना विलगीकरणापासून पळवाट शोधून काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुंबई मनपाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करुन सुधारित कार्यपद्धती तत्काळ लागू करण्यात आली आहे. जेणेकरुन, मुंबई विमानतळावर उतरल्यापासून प्रवाशांची पडताळणी, वाहतूक तसेच संस्थात्मक विलगीकरण या सर्व प्रक्रिया योग्यरीत्या पाडल्या जातील.

विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित नियम : विमानतळावर नेमलेल्या पथकाने दररोज आलेल्या प्रवाशांच्या आवश्यक ती संपूर्ण माहिती गोळा करावी लागणार आहे. त्यांनी मुंबईतील सर्व 24 विभाग कार्यालयनिहाय यादी तयार करावी लागणार आहे. जेणेकरुन, प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हॉटेल्ससाठी ती उपयोगात येऊ शकेल. विमानतळावर तैनात पथकाने दररोज अशी विभागनिहाय प्रवाशांची यादी संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त किंवा कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना ई-मेलने पाठवण्याचे आदेश आहेत.

माहिती गोळा केल्यानंतर विमानतळाबाहेर नेमलेल्या पथकाने संबंधित प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेल्समध्ये न्यावे लागेल. प्रवाशांची वाहतूक ही वाहतुकीसाठी नेमलेल्या बेस्ट बसेसद्वारे केली जाईल. संबंधित बेस्ट बसच्या वाहनचालकाससुद्धा प्रवाशांची यादी सुपूर्द कराणे बंधनकारक आहे. संबंधित बेस्ट बस चालकाने प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेलमध्येच नेऊन सोडावे लागेल. तसेच संबंधित प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याबाबतची पावती त्या-त्या हॉटेलकडून घेणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये पोहोचविल्याच्या पावत्या संबंधित बेस्ट बस चालकाने विमानतळावर परतल्यानंतर विमानतळ समन्वय अधिकाऱ्याकडे सुपूर्द कराव्या लागतील. विमानतळ समन्वय अधिकाऱ्याने प्रवासी आपापल्या हॉटेल्समध्ये पोहोचल्याबाबतच्या पावत्या आणि विमानतळाच्या आतील पथकाने बनविलेली प्रवाशांची यादी यांची फेरपडताळणी करुन सर्व प्रवासी हॉटेल्समध्ये पोहोचल्याची खातरजमा करावी लागणार आहे.

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागाच्या कार्यक्षेत्रात विलगीकरणासाठी आलेले प्रवाशी प्रत्यक्षात राहत असल्याची वेळोवेळी खातरजमा करावी. तसेच त्यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करावी लागणार आहे. सहाय्यक आयुक्तांनी नियुक्त केलेल्या तपासणी पथकांनी प्रत्यक्ष विलगीकरण केंद्रांना भेट देण्याचे नव्या नियमांत नमूद आहे. संबंधित प्रवाशी निर्देशित हॉटेलमध्ये पोहोचल्याची आणि विलगीकरण संदर्भातील नियमांचे योग्यरीतीने पालन करीत असल्याची खातरजमा या पथकाने करावी लागणार आहे.. प्रत्येक प्रवाशाच्या विलगीकरण कालावधीमध्ये किमान दोनदा याप्रकारची तपासणी करणे आवश्यक असेल. विलगीकरणाशी संबंधित कोणत्याही नियमाचे अथवा निकषाचे उल्‍लंघन झाल्याचे निदर्शनास आले तर सहाय्यक आयुक्त योग्य आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश आहेत. संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी विलगीकरण केंद्रांच्या तपासणीसाठी नेमलेल्या पथकांच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेण्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित पथकांनी विलगीकरण केंद्रांवर केलेल्या तपासणीचा साप्ताहिक अहवाल नियमितपणे तयार करुन त्याची प्रत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) आणि परिमंडळीय उपाआयुक्त यांना सादर करावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button