आरोग्य

दिवाळीनंतर लसीच्या एका डोसनंतरही मुक्त संचार; सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार!

मुंबई: राज्यात कोरोनाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली आली असून मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. मुख्य म्हणजे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत असल्याने हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा ठरला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मंदिरं, थिएटर्स उघडली आहेत. आता यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी वाढते या सर्व पार्श्वभूमिवर निर्णय होईल, असं ते म्हणाले. संख्या आटोक्यात राहिली तर सवलत मिळेल, असं ते म्हणाले. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये जर ‘सेफ’ असं स्टेटस आल्यास सवलती मिळू शकतील. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीनंतर आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे दिसत आहे. लसीकरण वेगवानपणे होत असल्याने त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्या घटत चालली असून आज दीड हजाराच्या टप्प्यावर ही संख्या आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती काहीशी चिंता वाढवणारी होती. तिथेही शनिवारी तीनशेपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निचांक (२५८ नवे रुग्ण) आज तिथे नोंदवला गेला आहे. राज्याचा विचार केल्या आज २६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली तर दिवसभरात १ हजार ५५३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याचवेळी १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नायर रुग्णालयात सुरू असलेली लहानग्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी यशस्वी झाली आहे. अजूनही या चाचणीत स्वयंसेवकांची गरज आहे. रुग्णालय प्रशासनाने यात सहभागी होण्यासाठी पालकांसह लहानग्यांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. लहान मुलांवरील लसीकरणाची चाचणी पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील वाय.बी.एल. नायर रुग्णालयात सुरू आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. या केवळ चार दिवसांत सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे यशस्वी लसीकरण सुरू झाल्यानंतर आता लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात होणार असल्यामुळे नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी २३०२७२०५ आणि २३०२७२०४ असे दोन दूरध्वनी क्रमांक नोंदणीसाठी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button