मुंबईत दीड वर्षात पहिल्यांदाच कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही !

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढात मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. उल्लेखनीय बाब अशी की मुंबईत २६ मार्च २०२० नंतर म्हणजेच गेल्या १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक देखील एक मोठं यश मानलं जात आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत ३६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. यासोबतच पॉझिटिव्हीटी दर १.२७ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे १० ते १६ ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हीटी दर केवळ ०.०६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. शहरात सध्या ५,०३० सक्रीय रुग्ण आहेत.
२६ मार्च २०२० नंतर आज प्रथमच मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद झाली नाही. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अशीच वाटचाल पुढेही सुरू ठेवायची आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा आणि प्रतिबंधक लस घ्यावी. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतच, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
राज्याची आकडेवारी पाहायची झाल्यास गेल्या २४ तासांत १७१५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २६८० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दुर्दैवानं २९ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६५,९१,६९७ वर पोहोचला आहे. तर आजवर ६४,१९,६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.