राजकारण

नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श : नितीन गडकरी

नागपूर : सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण आज जो विरोधी पक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. असे सांगतानाच पंडित जवाहरलाल नेहरु आणि अटल बिहारी वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श आहेत असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

नितीन गडकरी आपली कार्यक्षमता आणि स्पष्ट वक्तेपणामुळे अधिक ओळखले जातात. देशातील परिस्थिती, राजकारण आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशन अशा अनेकविध मुद्द्यावर एका कार्यक्रमात बोलताना रोखठोक मते मांडली. देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भारताच्या लोकशाहीचे आदर्श आहेत. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते, असे गडकरी यांनी नमूद केले.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या गोंधळाबद्दल गडकरी बोलत होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुन दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सभागृह तहकूब करावे लागले होते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करतानाची आठवण गडकरींनी सांगितली. एक वेळ अशी होती, जेव्हा सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा एकदा अटलजींना भेटलो होतो. ते मला म्हणाले की, लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही. लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मी सुद्धा पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे. मी माझ्या आयुष्यात इतकी वर्षे विरोधात काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आदराने वागले पाहिजे. संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे दुःख झाले, असे गडकरी म्हणाले.

सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके असतात. ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की विरोध देखील आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदार विरोधकाचे काम केले पाहिजे, ही त्यांच्यासाठी माझी सदिच्छा आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button