राष्ट्रपती राजवटीच्या मागणीत नवीन काय? जयंत पाटलांचा टोला
सांगली : राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होते. विरोधी पक्ष वारंवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असतो. यात नवीन काही नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची आवश्यकता नाही, असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
नुकतीच भाजपसह खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली, हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा केली, तपशीलात जाऊन तपासणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली. विरोधकांनी आरोप केल्यावर आम्ही गांभीर्याने घेतो, पण त्यांनी मागणी केली म्हणून कारवाई करावी असं होत नाही. मंत्रिमंडळात कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही, हे आम्ही याआधीही स्पष्ट केलंय, असं जयंत पाटलांनी सांगितलं.