राजकारण

नवाब मलिकांच्या आरोपांनंतर एनसीबीची सारवासारव

मुंबई : मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीनं उधळून लावली होती. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह एकूण १६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर वेगळच वळण मिळालं आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण १० पंच आहेत. प्रभाकर साईल, किरण गोसावी, मनीष भानुशाली, ऑब्रे गोमेज, आदिल उस्मानी, व्ही. वायंगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुजम्मिल इम्ब्राहीम अशी या १० पंचांची नावे आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात गेल्या चार दिवसांत एनसीबीनं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. मुंबईतील जोगेश्वरी भागात आज एनसीबीनं छापा टाकला. यात १५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून अब्दुल शेख नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या मोहक जयस्वालनं दिलेल्या माहितीच्या आधारे आज हा छापा टाकण्यात आला होता. तसेच नवाब मलिकांनी केलेले आरोप निराधार असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे.

नवाब मलिक यांचे भाजप, एनसीबीला सवाल

एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. एनसीबीने क्रूझवर छापा मारलाच नव्हता. भाजपच्या एका उपाध्यक्षानेच ही कारवाई केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याने कोणत्या अधिकारात ही कारवाई केली? एनसीबीही भाजपची शाखा झाली आहे का?, असे सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनिष भानुशालीचे काही फोटोही त्यांनी व्हायरल केले आहेत. एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असं सांगतानाच भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button