पाकिस्तानला फुकट लस देता, मग देशातील नागरिकांना का नाही? नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. तसंच पाकिस्तानला भारतानं लस फुकट दिली मग देशातील नागरिकांना का नाही, असा सवालही त्यांनी केला.
केंद्र सरकारला लस १५० रुपयांना द्यायची आणि तीच राज्यांना ४०० रुपयांना या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यावर आंदोलन करणार होतो, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळं आंदोलन टाळल्याचं पटोले म्हणाले. केंद्र सरकारनं फक्त दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिली. त्यामुळं यामध्ये या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आता नागरिकांना लस पुरवणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असंही पटोले म्हणाले. देशामध्ये लसीकरण हे केंद्र सरकारने मोफत करावे या मागणीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं.
केंद्र सरकार एकीकडे भारताचा शत्रू अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मोफत लस देत आहे. मात्र देशातील नागरिकांना त्यासाठी पैसे मोजायला सांगत आहे. देशाला लस मोफत का देत नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. पुनावाला हे कुणाचे मित्र आहेत, या भानगडीत मला पडायचे नाही. सरकारनं नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पटोले यांनी या पत्रकार परिषदेत केली. तसंच लसीच्या पुरवठ्यामध्ये निर्माण होणार तुटवडा यामागं नफेखोरीचा प्रकार असल्याचा संशय पटोले यांनी व्यक्त केला.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मार्चच्या सुरुवातीलाच देशातून कोरोना गेला असं सांगितलं. मात्र देशात कोरोनाच्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनअभावी तडफडून अनेकांनी प्राण गमावले आहेत, यासाठी कोण जबाबदार असा सवाल पटोले यांनी केला. केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळंच ऑक्सिजन आणि रमेडेसिविरचा तुटवडा असून, त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. कोरोनाची आकडेवारी महाराष्ट्रात अधिक आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात आकडे लपवले जात नाहीत. त्यामुळंच राज्यात जास्त कोविड असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. पण प्रत्यक्षात इतर ठिकाणी आकडे लपवले जात असून हळूहळू खरं चित्र समोर येत असल्याचंही पटोले म्हणाले.




