राजकारण

गुन्हा दाखल झाल्याने फडणवीस घाबरले; नवाब मलिकांचा पलटवार

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती वर्षा निवासस्थान, मंत्रालय, मनपा कार्यालयात येत होती. राज्याचे अधिकारी भेटायचे. त्यात निरज गुंडेनं ट्वीट करुन या अहवालाबाबत सांगितलं. हा अहवाल दोन ठिकाणांहून फुटला. डीजीपी कार्यालय आणि निरज गुंडे यांनी हा अहवाल फोडला. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस घाबरले असतील, असा टोला मलिकांना लगावलाय. आता फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते म्हणतात की मलिकांनी अहवाल फोडला. आम्ही तो अहवाल मांडला, आमचा तो अधिकार आहे, असंही मलिक म्हणालेत.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ शमत नाही तोवर फोन टॅपिंगवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आपण फोडलेला नाही. मी या अहवालाचं फक्त कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसार माध्यमांना उपलब्ध करुन दिला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर आता मलिकांनी फडणवीसांवर पलटवार केलाय. तो अहवाल लोकांच्या समोर ठेवणं हे माझ कर्तव्यच असल्याचं नवाब मलिक म्हणालेत. देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो 6 जीबीचा डेटा दाखवावा, असं आव्हानच मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला आहे.

अहवाल नवाब मलिक यांनी फोडला: फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

अज्ञाताविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंबईच्या सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला याबाबत आता चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला एसआयडी प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत अल्यापासून काही गृहमंत्र्यांसह काही मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एक अहवाल लीक झाला असून विरोधकांनी या अहवालावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

रश्मी शुक्ला (एसआयडी) प्रमुख असताना फोन विनापरवानगी काही मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. या फोन टॅपिंगचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केला असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यांचे फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. याच अहवालाच्या आधारावर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपने या अहवालावरुन राज्य सरकार पोलीसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button