नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले आहेत. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले आहेत. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हातात दि.बा पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी दि.बा पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी होत आहे. आंदोलनस्थळी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलीय. एल्गार स्टेजच्या शेजारीच महिलांनी वडाच्या झाडाला फेरे मारले. यावेळी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्याचं महिलांनी साकडं घातलंय.
सरकारला ताकद दाखवू, आंदोलनकर्त्यांचा इशारा
नवी मुंबई पाम बीच रोडवर सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढली आहे. मुंबई, पालघर, विरार, ठाणे वसई या ठिकाणच्या गाड्या गणपतराव तांडेल मैदानाच्या दिशेनं येण्यास सुरवात झाली आहे. आग्री कोळी समाजाला पाठिंबा देण्यासाठी गणेश पाटील आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारला आज समाजाची ताकत दिसेल, त्यानुळे येत्या काळात सरकारने सावध राहावं असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजकारण्यांमुळे घोळ : राजू पाटील
नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे. पण त्यात काही राजकारणी घोळ घालत आहे. पण आम्ही मात्र यावर ठाम आहोत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण सरकार घाबरलं की पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवते, असे राजू पाटील म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा आग्रह म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालहट्ट – भाजप
नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली. अजय चौधरींच्या एका पत्रावर मुख्यमंत्री कॅन्सरग्रस्तांच्या खोल्यांच्या विषयाला स्थगिती देतात, इथे मात्र इतकं मोठं आंदोलन होऊनही लक्ष देत नाहीत. यावरूनच मुख्यमंत्र्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल किती आस्था आहे हे दिसतं. सध्या जे भूमिपुत्र शिवसेनेत आहेत त्यांना या मुद्द्यावरून दाबलं जातंय. पण ज्यावेळी दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं जाईल. त्यावेळी सर्वात पहिला गुलाल उधळणारे भूमीपुत्रांमधले शिवसैनिक असतील, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
दि.बा. पाटील यांचे नाव का?
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन राजकारण पेटलं आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. तिकडे बंजारा समाजाने या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वस्तूस्थिती मांडत, नवी मुंबईतील विमानतळ हे स्वतंत्र नसून, ते मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे जे नाव मुंबई विमानतळाला आहे, तेच नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव नवी मुंबई विमातळाला असेल, असं म्हटलंय.
दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. नवी मुंबईतील अनेक विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी अनेक नेते आणि कार्यकर्तेही घडवले आहेत. सिडकोकडून नवी मुंबईची उभारणी केली जात होती. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पण योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिबांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला होता.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचलं आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात
दि. बा. पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सरसावलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावात, रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहेत. कोळी बांधवांकडून वाशी खाडीमध्ये होडीवर बॅनरबाजी करण्यात आली.
पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बा. पाटील यांची कारकिर्द राहिली आहे. त्यांनी आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचं कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावं यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी म्हणून नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं, अशी मागणी होत आहे.