नाशिक पोलीस नारायण राणे यांचा जबाब ऑनलाइन नोंदविणार
नाशिकः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस येत्या २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली. त्यांना महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले होते. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती, अशी भाषा केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करत युवासेना आणि शिवसेनेने मुंबईतील नारायण राणे यांच्या घरासमोर वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात जोरदार निर्देशने केली होती. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणीही गुन्हा दाखल झाला होता.