दगडफेक करणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ, ही भाजपसाठी धोक्याची घंटा; आ. मिटकरी यांचे प्रत्युत्तर
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला घाबरत नाही. मात्र ज्या दोनचार लोकांनी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर ३० जून रोजी एका तरुणाने दगडफेक केली. त्यानंतर आज (१ जुलै) दोन तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर कार्यालयावर हल्ला चढवला. सोलापूर शहरात असलेल्या रामलाल चौकातील सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन व्यक्तींनी केला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
जिकडे कोणीच नाही. निर्मनुष्य ठिकाणी एक दोन कार्यकर्ते सोडून दगड मारुन मी वंचितांचा नेता आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्यांना घाबरत नाही. मात्र त्यांच्या दोनचार लोकांनी जी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी, योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही हिंसेचं समर्थन केले नाही. हा पुन्हा पब्लिसिटी स्टंट आहे, अमोल मिटकरी म्हणाले. तसेच हा व्यक्ती पिसाळलेला आहे. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे म्हणत त्यांनी पडळकर यांच्यावर टीका केली.
दरम्यान पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो २५ वर्षांचा तरुण आहे.
सोलापुरातील एका शाळेत तो लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. हा तरुण स्वतः धनगर समाजातील असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे.




