फडणवीसांच्या कट्टर समर्थकाकडून अजित पवारांवरील आयकर छाप्याचा निषेध
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. तर भाजप नेते कर नाही तर डर कशाला असं म्हणत आहेत. अशावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या छापेमारीचा निषेध केलाय. देवेंद्र फडणवीस समर्थक असलेल्या नरेंद्र पाटलांनी अजित पवारांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय.
राज्यातील काही लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. काही पुरावे सापडले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या कारवाया फक्त दिखावा आहे का? असा सवाल राज्यातील जनतेला पडला आहे. जर यंत्रणेकडे योग्य पुरावे असतील तर या लोकांना घरात घुसून का अटक होत नाही? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केले. तर संबंधित विभागाकडून कारवाया योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याने त्यांनी या कारवायांबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू हातावर काढणाऱ्या नरेंद्र पाटलांच्या मनात आहे तरी काय? अशी चर्चा रंगली आहे.