मोदी सरकारकडून अद्याप फसवणूक; राकेश टिकैत यांची सडकून टीका

मुंबई : वर्षभर चाललेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पण सरकार अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैत याांनी केला आहे. सरकारचा उद्देश साफ नाही, सरकार शेतकऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.
दिल्लीतल्या ऐतिहासिक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते राकेश टिकैत आज मुंबईत आले आहेत. मुंबईत आझाद मैदानातील कार्यक्रमात बोलताना शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार तोफ डागली आहे. आझाद मैदानात बोलताना त्यांनी केंद्र सराकरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पालघरमधील आदीवासींच्या जमीनी बळकावण्याचं काम सुरू असल्याचा, जंगले कापली जात असल्याचा आरोपही राकेश टिकैत यांनी केला आहे. सरकार अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळी नाव देत आहे. आधी पंजाबींना खालीस्तानी म्हणाले, हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, पण आपण रागाला न जाता एकजुटीनं रहा असं आवाहनही राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. जे दिल्लीला आले नाहीत मात्र या आंदोलनाचं समर्थन करतात त्या शेतकऱ्यांचंही हे आंदोलन आहे. इथे प्रत्येक भाषा बोलणारा शेतकरी आहे, एक वर्ष अतिशय कठीन काळ होता असंही टिकैत म्हणालेत. आझाद मैदान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक जागा आहे.
महाराष्ट्रतील बरेच दिवस चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनावरही राकेश टीकैत यांनी भाष्य केलं आहे. एसटी संदर्भात खासगीकरण न करता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकारनं मदत करण्याचं राकेश टिकैत यांनी आवाहन केलं आहे.




