राजकारण

अंबानी यांच्या घराजवळ सचिन वाझेच्या खासगी ड्रायव्हरने कार पार्क केली!

एनआयएचा मोठा खुलासा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल एनआयएने मोठा खुलासा केला आहे. स्फोटकं असलेली कार वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी ड्रायव्हरने पार्क केली होती, असं एनआयए तपासातून समोर आलं आहे.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सध्या एनआयकडून सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे तत्कालिन प्रमुख सचिन वाझे यांच्यासह काही जणांना अटक केलेली आहे. संशयित आरोपींची चौकशी सुरू असून, दररोज नवनवी माहिती समोर येत आहेत.

अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ २५ फेब्रवारी रोजी पार्क करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांचा खासगी चालकाने पार्क केली होती. तर सचिन वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवत होते, अशी माहिती आता एनआयए तपासातून समोर आली आहे. पांढरी स्कॉर्पिओ पार्क करेपर्यंत इनोव्हा तिच्या मागे होती. १७ मार्च रोजी मनसुख हिरेन यांनी मुलुंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्याच दिवशी मनसुख हिरेन हे शहर पोलीस मुख्यालयात आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये सचिन वाझे यांच्याकडे कारची चावी दिली, असं एनआयएचं म्हणणं आहे.

सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी ड्रायव्हर स्कॉर्पिओ उभी करण्यात आलेल्या मुलुंड-ऐरोली रस्त्यावर गेला. वाझेंच्या ड्रायव्हरने कार सोसायटीत आणली. त्यानंतर २४ फेब्रवारीपर्यंत कार तिथेच उभी होती. २५ फेब्रवारी रोजी ड्रायव्हर ती कार घेऊन दक्षिण मुंबईत गेला आणि अंबानींच्या घराजवळ कार पार्क केली. ड्रायव्हर ज्यावेळी स्कॉर्पिओ घेऊन अँटिलियाच्या दिशेनं येत होता, पोलिसांनी गाडी अडवू नये म्हणून वाझे स्कॉर्पिओच्या मागेच होते. रात्री दहा वाजता ड्रायव्हरने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली कार पार्क केली. त्यानंतर उतरून तो वाझे चालवत असलेल्या इनोव्हा गाडीत जाऊन बसला, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button