राजकारण

उद्या निवडणुका झाल्या तरी मोदी ४०० हून अधिक जागा जिंकतील : चंद्रकांत पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजपने आज मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, विनायक मेटे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी हा विश्वास व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचं टूलकिट आणि राहुल गांधी हे करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील. टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.

यावेळी मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, कायदा अयोग्य असता तर नोकऱ्या, प्रवेश कोर्टाने कसे दिले असते, राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले. मराठा समाजाच्या आंदोलनात भाजप पाठींबा देणार, एक तज्ज्ञ समिती नेमून कायदा कसा योग्य आहे वगैरे या गोष्टी दाखवून देऊ. नवा मागासवर्गीय आयोग हा सरकारलाच नेमावा लागेल. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल, मग हा अहवाल केंद्राला पाठवावा लागेल.

राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लॉकडाऊननंतर आढावा घेऊन निर्णय घ्यायचा असतो, पण आत्ताच पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल अशी भाषा करत आहेत. मराठा समाज शांत बसणार नाही, भाजप पाठींबा देईल. मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवला जात आहे, मराठा आंदोलन पेलवणार नाही, झेपणार नाही, त्यामुळे ही खेळी केली जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं सुद्धा. मात्र महाविकास आघाडी सरकारने भक्कम बाजू न मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं, असा दावा चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button