वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हता, त्याचं काय झालं?
बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर राजकारण संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही, असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आमच्या हातात सूत्र द्या, तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन देतो, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन थोरात यांनी टोला लगावला. सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं थोरात म्हणाले.
फडणवीसांची महाराष्ट्राला गरज : संजय राऊत
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत.




