रत्नागिरी : अटकनाट्यामुळे स्थगित झालेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी पुन्हा रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच उपस्थितीत सुरू झाली. याआधी झालेल्या राजकीय गोंधळामुळे मनाई आदेश असतानाही भाजपाने जनआशीर्वाद यात्रा काढण्याची भूमिका कायम ठेवली आणि त्यानुसार मंत्री नारायण राणे यांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. राणे यांनी आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी आंबा-काजू बागायतदारांशी संवाद साधला. राणे सुमारे दहा मिनिटे बोलले. पण या दहा मिनिटात त्यांनी शिवसेनेवर अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
नारायण राणे यांनी रत्नागरीत आंबा, काजू बागायतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काजू- आंबा बागायतदारांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. तसेच त्यांनी जन आशीर्वाद यात्रेचं महत्त्व समजून सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात आणलेल्या योजनांची माहितीही दिली. यावेळी आंबा-काजू बागायतदार संघाकडून राणेंचा गोळप गावी सत्कार करण्यात आला.
तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी रत्नागिरीला आलो आहे. मी एवढंच सांगेल तुमचे निवेदन मला मिळाले आहे. याचा पुरेपूर अभ्यास करुन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एक बागायतदार मला आत्महत्या करेल असं म्हणाला. मात्र मी कुणाही व्यक्तीला आत्महत्या करू देणार नाही. मी एका महिन्याच्या आत अधिकाऱ्यांना घेवून येईल आणि तुमचे प्रश्न सोडवणार, अशी ग्वाही राणेंनी दिली. मात्र, या दहा मिनिटाच्या भाषणात राणे यांनी शिवसेनेवर किंवा राज्य सरकारवर टीका केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलाय. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असं लिहिलं आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यामागील ठोस कारण आणखी समजू शकलेलं नाही.