
अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. गुजरातच्या जनतेनं आजवर दाखवलेल्या विश्वासाचे आणि भाजपाचे आभार व्यक्त करतो. माझ्या राजीनाम्यामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी व जबाबदारी मिळेल, असं रुपाणी यांनी यावेळी म्हटलं आहे.
रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय रुपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आजवर केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार व्यक्त केले. तसेच जनतेनं आजवर दिलेल्या प्रेमाचा कायमस्वरुपी ऋणी राहीन असंही रुपाणी म्हणाले. कोविड काळात माझ्या नेतृत्त्वात आम्ही राज्यात दिवसरात्र काम करुन नागरिकांची सेवा केली याचं समाधान असल्याचंही ते म्हणाले. यापुढील काळात पक्षाच्या कामात स्वत:ला व्यग्र ठेवण्याची इच्छाही रुपाणी यांनी बोलून दाखवली आहे.
रुपाणी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांना आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले. राज्यपालांची भेट घेण्यासाठी विजय रुपाणी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल देखील उपस्थित होते. गुजरातमध्ये डिसेंबर २०२२ साली विधानसभा निवडणूक नियोजित आहे. त्याआधीच विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात भाजपामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष देखील गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
लिहून आणलेले निवेदन वाचून दाखवले
राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यामागचं कारण देखील स्पष्ट केलं. यासाठी ते एक पत्रकच घेऊन आले होते. लिहून आणलेली माहिती त्यांनी वाचून दाखवली. गुजरातच्या विकास यात्रेत मला योगदान देण्याची संधी मिळाली. मला दिलेल्या जबाबदारीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो, असं रुपाणी म्हणाले.
गुजरातची विकास यात्रा यापुढेही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात एका नव्या उत्साह आणि ऊर्जेसह पुढे सुरू राहावी असं मला वाटतं. यासाठीच मुख्यमंत्रिपदाचा मी राजीनामा दिला आहे. भाजपा हा एक संघटना आणि विचारधारांवर चालणारा असल्यामुळे कालानुरुप संघटनेत कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होत असतात अशी भाजपाची परंपरा आहे. जी जबाबदारी दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता करतो हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. पक्षाकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पक्ष संघटनेत नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे, असंही रुपाणी यांनी म्हटलं आहे.
उत्तराखंड, कर्नाटक आणि आता गुजरात !
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, गुजरात आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपने अनेक राज्यांमध्ये थेट मुख्यमंत्री बदलण्यासच सुरुवात केली आहे. उत्तराखंड, कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिकाधिक बळकट करण्याचं भाजपमध्ये घटत असल्यानेच भाजपने मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा
या आधी २ जुलै रोजी तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना रावत यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम १५१ प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ १ वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे, असं रावत यांनी म्हटलं होतं.
येडियुरप्पा यांचा राजीनामा
बीएस येडियुरप्पा यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या होत्या.




